नंदुरबार - जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने नंदूरबार जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये आहे. मात्र, लॉकडाऊनमधून शिथिलता मिळण्यापूर्वीच जिल्ह्यातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर नेहमीप्रमाणे वर्दळ होऊन किराणा, भाजीपाला, बँका, एटीएम अशा अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. या वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर व शासनाच्या नियमांचे कुठल्याही प्रकारचे पालन होत नसल्याने नियमांचा जणू फज्जा उडाला. ग्रीन झोनचा फायदा घेत एकप्रकारे नंदुरबार जिल्ह्यावासियांनी मोकळीकता साधल्याचे चित्र दिसून आले.
कोरोना विषाणुला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविले असून राज्यातील जिल्ह्याची रेड, ऑरेंज व ग्रीन झोन अशी ३ विभागणी केली आहे. रेड व ऑरेंज झोनचे जिल्हे वगळता ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना काहीशी शिथीलता दिली जाणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने ग्रीन झोनमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे आणखीन काही दिवस लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केल्यास दि. 21 एप्रिलनंतर नंदुरबार जिल्ह्यात काही प्रमाणात मुभा दिली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. परंतू, जिल्ह्याच्या सिमेलगतच्या परराज्य व नजीकच्या धुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने नंदुरबार जिल्हावासियांना आणखी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मात्र, नंदुरबार जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याचा फायदा घेत नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील नवापूर, शहादा अशा बहुतांश ठिकाणी जणू सर्वकाही सुरळीत झाल्यासारखी वर्दळ दिसून आली.
नंदुरबार शहरातील दीनदयाल चौक, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, मोठा मारुती मंदिर परिसर, जुनी नगरपालिका परिसर, आमदार कार्यालय, जुने न्यायालय परिसर या भागात नागरीकांची एकच वर्दळ झाली. किराणा दुकान, भाजीपाला खरेदी आणि पैसे काढण्यासाठी बँकांसह एटीएम केंद्रांवर नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक बँक व एटीएम केंद्रांच्या ठिकाणी सुरक्षित अंतराचे नियम पाळण्यात आले नाही. कामकाजासाठी रांगेत नागरीकांनी गर्दी केली. यामुळे लॉकडाऊनसह सुरक्षित अंतर व शासन, प्रशासनाच्या नियमांचा नागरिकांनी फज्जा उडाल्याचे दिसून आले.
काही ठिकाणी पोलीस व्हॅनद्वारे लॉकडाऊन असल्याने विनाकारण बाहेर फिरु नका, नियमांचे पालन करा, असे आवाहन ध्वनीक्षेपकातून करण्यात येत होते. शहरातील हाटदरवाजा याठिकाणी ये-जा करणार्या नागरिकांना थांबवून चौकशी केली जात होती. मात्र, बुधवारी शहरात बहुतांश ठिकाणी नागरीकांची नेहमीप्रमाणे वर्दळ झाल्याने सारे काही आलबेलं झाल्याचे चित्र दिसून आले. जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाकडून आवाहन केले जात असून नंदुरबारवासियांनी ग्रीन झोनची मोकळीकता न साधता दि.21 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे पालन करणे गरजेचे आहे. परंतू, लॉकडाऊन निघण्यापूर्वीच झालेल्या वर्दळीनंतर प्रशासनाला कार्यवाही मोहीम राबविण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येत आहे.
नवापुरातही नागरिक रस्त्यावर
नवापूर शहरातही अनेक ठिकाणी नागरिकांची रस्त्यावर वर्दळ दिसून आली. नवापूर शहरातील बसस्थानक, गांधी पुतळा या परिसरात जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने अर्धवट उघडून व्यवहार सुरू झाले होते. तर, भाजीपाला मार्केट, सरदार चौक, युनियन बँक याठिकाणी खरेदी-विक्रीसाठी नागरीकांची एकच गर्दी झाली. त्यामुळे नवापुरातही अनेकांनी ग्रीन झोनची मोकळीकता साधता खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले.