नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यात सुरु असलेला बनावट मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस दलाने मोहीम सुरु केली आहे. जुनी वाण्याविहिर येथे एका घरात बनावट मद्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर या घरावर छापा टाकण्यात आला.
हेही वाचा - धक्कादायक: जळगावात ज्वारीची कापणी करताना ५ जणांवर कोसळली वीज
या घरात रिकाम्या बाटल्यांमध्ये दारू भरण्याचे काम सुरु असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. 1 हजार 680 बनावट व्हिस्कीच्या बाटल्या, 200 लीटर बनावट विदेशी मद्य, बुच, रिकाम्या बाटल्या, पुठ्ठ्यांची खोकी आणि मद्य तयार करताना तीव्रता मोजण्यासाठी लागणारे साहित्य असा साठा जप्त करण्यात आला.
या ठिकाणी उपस्थित असलेल्या घरमालक महिलेला पोलिसांनी अटक केली. मात्र, कारखाना चालवणारा मुख्य सूत्रधार फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.