नंदुरबार- धडगाव तालुक्यातील शेलकुवा गावातील नागरिक गेल्या १५ वर्षांपासून रेशनापासून वंचित आहे. यामुळे संतापलेल्या गावाकऱ्यांनी धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातून येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले व त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.
शेलकुवी येथील रेशन दुकानदार गावकऱ्यांना रेशन देत नव्हता. त्यामुळे गावकऱ्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, पुरवठा अधिकाऱ्याने गावकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. त्याचबरोबर, तक्रारीचा कुठलाही परिणाम रेशन दुकानदारावर झाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले. यावेळी गावातील सर्व नागरिकांनी आपले रेशनकार्ड सोबत आणले होते.
आम्हाला १५ वर्षांपासून रेशन मिळाले नाही. आमच्या हक्काचे रेशन कुठे जाते, असे प्रश्न आदिवासी दुर्गम भागातून आलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. गावातील रेशन दुकानदाराची चौकशी करून दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले.
हेही वाचा- भाजपतर्फे नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी