नंदुरबार - निजामपूर रस्त्यावर वाळूने भरलेला डंपर आणि दुचाकीत झालेल्या अपघातात आई ठार तर मुलागा आणि नात जखमी झाल्याची घटना घडली. नांदरखेडा फाट्याजवळ हा अपघात झाला. आशाबाई भगवान माळी (वय 55, रा.मोठा माळीवाडा, नंदुरबार) असे त्या मृत महिलेचे नाव असून डंपर चालक किरण विलास गायकवाड (रा.खडकजाम ता.चांदवड, जि.नाशिक) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
दुचाकीला डंपरची धडक
नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा फाट्याजवळून ज्ञानेश्वर माळी आपली आई आशाबाई आणि मुलगी प्रणालीसोबत नंदुरबारहुन निजामपुरकडे दुचाकीवर जात होते. नांदरखेडा फाट्याजवळ त्यांची गाडी आली असता वाळूने भरलेल्या भरगाव डंपरने दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत डंपरच्या मागच्या बाजूचे फलक आशाबाईंच्या कानाला इतक्या जोरात लागले की त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर ज्ञानेश्वर आणि प्रणाली यांच्यावर नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
काही दिवसांपूर्वीच डंपरने घेतला होता २ जणांचा बळी-
काही दिवसांपूर्वीच डंपर नंदुरबार तालुक्यातील नांदखेडा शिवारात रात्रीच्या वेळी शेतातील घरात घुसल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. एवढेच नाही तर या अगोदर डंपरच्या धडकेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा- चाकण येथील मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी आणखी एकाला अटक; २५ लाखांची रोकड जप्त