नंदुरबार - मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजानचा महिना सुरु असल्याने बाजारपेठेमध्ये इफ्तारीसाठी लागणाऱ्या साहित्याची रेलचेल झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने उपवास सोडण्यासाठी लागणारे खजूर व अन्य फळांची मागणी वाढली आहे.
मुस्लीम बांधवांमध्ये रमजान महिन्यात महिनाभर रोजा (उपवास) केला जातो. पहाटेपासून काही खाता न पिता मुस्लीम बांधव उपवास करत असतात. सायंकाळी उपवास सोडण्यासाठी प्रामुख्याने खजूरचा वापर मुस्लीम बांधव करतात. तसेच उपवास सोडण्यासाठी फळांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे रमजानमध्ये फळाला मागणी वाढते.
बाजारपेठेमध्ये सद्या उपवास सोडण्यासाठी टरबूज, खरबूज, पपई, तसेच अनेक विविध प्रकारचे खजूर यासह अनेक फळ उपलब्ध आहेत. मात्र, खजूर खरेदीकडे मुस्लीम बांधवाचा कल असल्याचे पाहायला मिळत आहे.