नंदुरबार - लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. मंगळवारी नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्यावतीने मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी रॅलीचा शुभारंभ करून स्वत: त्यात सहभाग घेतला.
दिव्यांग बांधवांनी मतदानाबद्दल दाखविलेला उत्साह जिल्ह्यातील सर्व मतदारांनी दाखवावा. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा. राष्ट्राप्रती असणारे महत्वाचे कर्तव्य म्हणून सर्व मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले. यावेळी त्यांनी दिव्यांग बांधवांचे मतदार जागृतीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कौतुक केले.
निवडणूक आयोगाने यावेळी ‘सुलभ मतदान’ संकल्पनेवर भर दिला असून मतदानाच्यावेळी दिव्यांग मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सुविधांसाठी ‘पीडब्ल्युडी’ अॅपदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिव्यांग मतदारांना वाहतूक आणि रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अशा मतदारांना सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.