नंदुरबार - सारंगखेडा येथील घोडे बाजार जातिवंत घोड्याचा खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे किंमती घोड्यांची खरेदी विक्रीही या ठिकाणी होत असते. यावर्षी सारंगखेडा घोडे बाजारात लाखो रुपये किमतीचे अश्व विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तर, घोडे बाजरात येणारे अश्वप्रेमीही या महागडया घोड्यांना पाहण्यासाठी सारंगखेड्यात दाखल होत आहेत. सारंगखेडा घोडेबाजारात आत्तापर्यंत सर्वात महाग असलेल्या राजवीर आणि कल्याणी या २ खास घोड्यांना बघण्यासाठीही अश्वप्रेमींची विशेष गर्दी होत आहे.
घोड्यांची किंमत त्यांची उंची, रंग आणि चाल याच्यावर ठरत असते. घोडा जितका रुबाबदार त्याची किंमत तितकी जास्त असते. सारंगखेड्याच्या घोडे बाजारात राजवीरची किंमत १-२ नव्हे तर, तब्बल ५५ लाख रुपये आहे. राजवीरची उंची ही ६७ इंच, रंग पांढरा शुभ्र, निळे डोळे आणि रुबाबदार चाल असे त्याचे वैशिष्ट आहे. तो या घोडे बाजारातील आजपर्यंतचा सर्वात उंच घोडा आहे. राजवीरची सेवा करण्यासाठी २४ तास ८ मजूर कार्यरत असतात. त्याच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जाते. त्याला दररोज ५ लिटर दुध, १ किलो गावराणी तूप तसेच चना डाळ, गहू, बाजरी, कोरडा आणि सुका चारा इत्यादी खाऊ घातले जाते. राजवीरमध्ये लाखो घोड्यातून एकात असलेले भुजबळ नावाचे शुभ लक्षण आहे.
सारंगखेडा येथील घोडे बाजरात राजवीरनंतर बोलबाला आहे तो पवनसिंग चावला यांच्या कल्याणी या घोडीचा. देशभरात झालेल्या घोड्यांचा स्पर्धेत कल्याणी सलग ६ वेळा विजयी ठरली आहे. ती मारवाड जातीची असून तिचे चारही पाय पांढरे आणि संपूर्ण शरीर काळे आहे. तिच्या डोक्यावर एका पांढरा पट्टाही आहे, याला पंचकल्याण असे म्हणतात. कल्याणी ची उंची ६६ इंच आहे. एखद्या सौंदर्यवतीप्रमाणे तिच्या खुराकाची काळजी घेतली जाते. तिला आहारात दररोज ५ लिटर दुध, १ किलो तूप, अंडी, गहू, चना आदी खाद्याचा समावेश असतो. कल्याणीला पाहण्यासाठी अश्वप्रेमी मोठ्या प्रमाणात दुरवरून येत असतात.
हेही वाचा - सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधी यांचा नंदुरबारमध्ये निषेध
घोड्यांची किंमत लाखोच्या घरात का असते? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, यावर अश्व जाणकारांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, घोड्याची उंची, रंग, त्यातील शुभ लक्षण आणि त्याची ब्लड लाईन यावर घोड्याची किंमत ठरत असते. इतके महागडे घोडे विकत घेणे अनेक अश्वप्रेमींना शक्य नसते. त्यामुळे, देशभरातील आश्वप्रेमी या घोड्यांना पाहण्यासाठी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलला दरवर्षी हजेरी लावत असतात. असे रुबाबदार घोडे आपण आजपर्यंत कुठेही पहिले नसल्याचे या वेळी अश्वप्रेमींनी सांगितले.
सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल दत्त जयंतीपासून अधिक रंगतदार झाला आहे. या फेस्टीवलमध्ये आणखी किंमती घोडे दाखल होतील आणि त्यांच्या किंमती २ कोटीपर्यंत असतील असे अश्व जाणकारांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - जिल्हा परिषद निवडणुका शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार; इच्छूक उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती