नंदुरबार- जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्याचा पदभार गुरुवारी सकाळी 11 वाजता स्वीकारला. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतील अस्वच्छता आणि प्रत्येक विभागातील अस्ताव्यस्त दस्ताऐवजावर डॉ. भारुड यांनी नाराजी व्यक्त करत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यांनी तात्काळ स्वच्छता आणि दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधितांना दिले.
आपण स्वत: आदिवासी समाजाचे असल्याने तळागाळातील आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी चांगल्या प्रकारचे प्रशासन चालवण्याचा आपला प्रयत्न राहील, असा विश्वास देखील जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदावर भारुड यांची नेमणुक झाली आहे. तर दुसरीकडे तीन महिन्यांपुर्वी आलेल्या जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची तडकाफडकी बदली झाल्याने चर्चाना उधाण आले आहे.