नंदुरबार - शासकीय सेवेत काम करणाऱ्या शिक्षकांना बाहेर व्यवसाय म्हणून क्लास चालवण्यास कायद्यानुसार मनाई आहे. तरीदेखील जिल्ह्यातील शासकीय सेवेतील शिक्षक खासगी कोचिंग क्लासेस चालवतात. त्यामुळे खासगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात खासगी कोचिंग क्लासेस चालक संघटनेची शासकीय शिक्षकांविरुद्ध आंदोलन केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार शासकीय सेवेत काम करणाऱ्या शिक्षकांना खासगी कोचिंग चालवण्यास मनाई आहे. या विरोधात वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनद्वारे शनिवारी नंदुरबारमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी शासकीय शिक्षकांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
खासगी कोचिंग क्लासेस संघटनेद्वारे गेल्या वर्षभरापासून या मोहिमेचा पाठपुरावा केला जात आहे. परंतु, शासन व शासकीय सेवेत काम करणारे शिक्षक याकडे दुर्लक्ष करत आहे. यापुढेही असेच सुरू राहिले तर आमच्या बायका पोरांसह आम्ही मुंबईला मुख्यमंत्र्यांसमोर आमरण उपोषणाला बसणार असून, याविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याची ग्वाही आंदोलनकर्त्यांनी दिली.