नंदुरबार - पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंबा-थेंबाचे संकलन करून ते जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक सरपंच व ग्रामस्थांना पत्राद्वारे केले आहे. त्याप्रमाणे विसरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बकाराम गावित यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार नदी खोलीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे.
तसेच परिसरातील ग्रामस्थही श्रमदानातून सकाळी आणि संध्याकाळी अशा २ सत्रात नदी खोलीकरण, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून गाळ काढणे तसेच पाणी अडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
गेल्यावर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. महाराष्ट्र राज्य दुष्काळाला सामोरे जात आहे. यावर्षी अद्यापही पाऊस सुरू झाला नसल्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत. अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी तर पाण्याचे दुर्भिक्ष्यामुळे ग्रामस्थांना स्थलांतर करावे लागले आहे. भविष्यात अशी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये, पिण्याच्या व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई निर्माण होवू नये यासाठी पावसाळ्यातच पडणाऱ्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी देशातील सरपंचांना पत्र लिहून पाण्याचे नियोजन करण्याबाबत आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला विसरवाडी ग्रामस्थांनी साथ दिली आहे.
विसरवाडी ग्रामस्थदेखील पाणी टंचाईचा सामना करत आहेत. या कामाद्वारे येत्या काळात पाण्याची समस्या सुटली पाहिजे, या आशेने नागरिक श्रमदान करत कामाला लागले आहेत.