नंदुरबार - पावसाळ्याचा सुरुवातीला सापांचा प्रणय काळ असतो. नवापूर शहरातील रंगावली नदीकिनारी धामण जातीच्या सापाचे मिलन पाहण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी हे दृष्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. त्यातच घटनास्थळी उपस्थित आसलेल्या नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली.
नवापूर तालुक्यात पहिला पाऊस पडल्यानंतर परिसरात असलेले सापांचे बीळ (घर) पाण्याने बुजले जातात, त्यामुळे साप बाहेर निघून नवीन घराच्या शोधात फिरत असतात. पावसाळा सुरू झाला की, सापांच्या प्रणय काळाला सुरुवात होत असते. या काळात मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रणय क्रीडा पाहण्यास मिळतात. नवापूर शहरातील रंगावली नदीकिनारी धामण जातीच्या सापाची जोडी मिलनात रंगून गेली होती. नंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्पमित्रांच्या मदतीने त्यांना पकडून जंगलात सोडण्यात आहे. दरम्यान ही प्रणय क्रीडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सर्प बाहेर पडत असतात. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. सापांना मारू नये, तसेच नागरी वस्तीत साप आढळून आल्यास वनविभागाशी आणि सर्प मित्रांना संपर्क करण्याचे आहवान यावेळी वनविभागातर्फे करण्यात आले.