नंदुरबार - शहादा तालुक्यातील लोंढरे गावाजवळील मसरडे लघु प्रकल्पाला गळती लागली आहे. त्यामुळे ७ गावांना धोका निर्माण झाला आहे. त्याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासन धरण फुटण्याची वाट बघत आहे की काय? तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन धरण फुटल्यावरच सेल्फी काढायला येणार आहेत का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
मसरडे लघु प्रकल्प १३ वर्षांनी शंभर टक्के भरला आहे. मात्र, या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून भितींचे दघड ढासळले आहेत. त्यामुळे परिसरातील गावातील नागरिक भयभीत झाले आहे. गेल्या 1999 मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले होते. कुकावल, कोटली, लोंढरेसह परिसरातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग होतो.
परिसरातील नागरिकांनी या धरणाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यासह तोंडी तक्रारीही केल्या. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या मागणीकडे पाठ फिरवली आहे. प्रकल्प फुटला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
धरण परिसरात सुट्टीच्या दिवशी नागरिक पर्यटनासाठी येत असतात. मात्र, या धरणाची गळती बघून पर्यटकांनाही भीती वाटू लागली आहे. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ दुरुस्ती करून दुर्घटना टाळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्र राज्याचे लघुपाटबंधारे विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांना पक्ष मजबूत करण्यासाठी वेळ भेटतो. मात्र, धरणाची गळती थांबवण्यासाठी वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे.