नंदुरबार - शहादा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 9 वर पोहोचली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम कडक केले आहेत. मात्र, नागरिक नियमांचे उल्लंघर करून बाहेर फिरताना दिसत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यात अक्कलकुवा येथे चार, नंदुरबार शहरात चार, तर शहादा शहरात नऊ रुग्ण आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. तसेच शहरातील काही भागांना बफर झोन म्हणून नगरपालिकेने घोषीत केले आहे. मात्र, नागरिक त्या बफर झोनला लावलेले बॅरीगेट्स काढून दुसऱ्या परिसरात फिरताना दिसत आहेत. नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण शहादा येथे असले तरी नागरिकांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. नागरिकांनी नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आता जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.