नंदुरबार - नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात बर्ड फ्लूने पुन्हा एकदा शिरकाव केल्याचे समोर आले आहे. विसरवाडी येथील जावेद पोल्ट्रीचा अहवाल बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी भोपाळमध्ये असलेल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. दरम्यान या पोल्ट्रीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बर्ड फ्लूची माहिती मिळताच तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी पशुसंवर्धन विभागाचे 25 पथके घनटास्थळी पाठवून कलिंग ऑपरेशनला सुरुवात केली आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये एकूण 8 हजार 308 कुक्कुट पक्षी असून, ४० हजार ४२० अंडी आहेत.
दरम्यान बर्ड फ्लूची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील पथकांच्या माध्यमातून कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आली आहे. जावेद पोल्ट्री फार्मपासून एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित कोला आहे. या परिसरात बंगलावाला व जावेद असे दोन पोल्ट्री फार्म आहेत, दोन्ही पोल्ट्रीत साधारण १० हजार कुक्कुट पक्षी आहेत. आता हे सर्व नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांकडून देण्यात आली आहे.
नवापूरमध्ये पाच लाखांपेक्षा अधिक कुक्कुट पक्षी नष्ट
नवापूर परिसरातील एकूण २२ पोल्ट्रीतील पाच लाख ७८ हजार कुक्कुट पक्षी व २५ लाख अंडी नष्ट करण्यात आली आहेत. उर्वरीत 5 ते 6 पोल्ट्रीमध्ये असलेल्या कुक्कुट पक्ष्यांचे अहवाल तीनवेळा निगेटिव्ह आल्याने येथील पक्ष्यांचे कलिंग ऑपरेशन करण्यात आलेले नाही.
नुकसान भरपाईची मागणी
नवापूर परिसरातील २२ पोल्ट्री फार्म मधील कलिंग ऑपरेशन संपल्यानंतर प्रशासनाने पशुसंवर्धन विभागाच्या पथकामार्फत पोल्ट्री व्यवसायिकांना पोल्ट्रीतील कुकुट पक्ष्यांची विष्टा, पशुखाद्य गोदाम निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिल्याने पशुसंवर्धन विभाग आणि पोल्ट्री व्यावसायिकांकडून पोल्ट्री निर्जंतुकीकरणास सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान बर्ड फ्लूमुळे झालेल्या नुकसानाची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी पोल्ट्री व्यवसायिकांनी शासनाकडे केली आहे.
बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घ्यावी
नवापूर शहरात राज्यातील सर्वात मोठे कलिंग ऑपरेशन करण्यात आले, या दरम्यान लाखो पक्षी व लाखो अंडी नष्ट करण्यात आलेली आहेत. नवापूर परिसरातील ५-६ पोल्ट्रीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तेथे लाखो पक्षी व अंडी आहेत. बर्ड फ्लूची लागण होऊ नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बर्ड फ्लू रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना राबवण्यात याव्यात अशा सूचना प्रशासनातर्फे व्यवसायिकांना देण्यात आल्या आहेत.
गुजरात सीमावर्ती भागात विशेष काळजी घ्यावी
गुजरात राज्यातील उच्छल परिसरातील नॅशनल पोल्ट्रीत बर्ड फ्लूचा 'एच५ एन१' विषाणू आढळून आल्याने, नवापूर परिसरातील पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पोल्ट्रीतील 17 हजार कुक्कुट पक्षी गुजरातच्या पशुसंवर्धन विभागाने नष्ट केले आहेत. दरम्यान या परिसरामध्ये वास्तव्यास असलेल्या कुक्कुट पालकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.