नंदुरबार - जिल्ह्यातील नवापूर येथे बर्ड फ्लू आढळून आला आहे. त्या ठिकाणी प्रशासनाने जलद गतीने कोंबड्यांच्या कलिंगचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी येत्या चार दिवसांमध्ये दीड लाख कोंबड्यांचे कलिंग केले जाणार आहे, तर अन्य पोल्ट्री फार्मवर लक्ष ठेवले जाणार आहे. तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचे नमुने हे बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी भोपाळला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी दिली आहे. या ठिकाणी नाशिक, नगर, जळगाव, धुळे अशा उत्तर महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. 100 पथकांच्या माध्यमातून या ठिकाणी कलिंगचे काम केले जात आहे. चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे.
बर्ड फ्लू बाधितक्षेत्रात घ्यावयाच्या दक्षता -
नवापुर शहराच्या १० कि.मी. त्रिज्येतील परिसरात कुक्कुटपक्षी, अंडी व पक्षी खाद्याची खरेदी/विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा/प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील ९० दिवसांपर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे. १० कि.मी. परिघातील परिसरात गावातील आवागमन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात येत आहे. बर्ड फ्लूबाधित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांची ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्या ठिकाणची खासगी वाहने प्रसारीत परिसराच्या बाहेर लावावी. बर्ड फ्लू बाधित क्षेत्रात जिवंत व मृत वन्यपक्षी / कुक्कुटपक्षी, अंडी, कोंबडी खत, पशुखाद्य अनुषंगीक साहित्ये व उपकरणे इ.च्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
व्यावसायिक पोल्ट्री फॉर्ममध्ये मालक/कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन (ग्लोज,मास्क इ.) कामकाज करावे. फार्म सोडतांना स्वतःचे निर्जतूकीकरण करून घ्यावे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्राच्या नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस नियंत्रित करावे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्राच्या परिसरात २% सोडियम हायपोक्लोराईट, पोटॅशियम परमैंगनेटव्दारे निर्जंतुकीकरण करावे. बर्ड फ्लूबाधित क्षेत्रात व परिसरातील वन्यपक्षी/कुकुटपक्षी संबंधितांच्या सर्व नोंदी व्यवस्थित विशेष दक्षता घ्याव्यात. उघड्यावर मृत पक्षी /कोंबडी टाकू नयेत व तसेच त्यांची शास्त्रीय दृष्टीने विल्हेवाट स्थानिक स्वराज्य संस्थांनी लावावी. असे आदेश जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत.
१५ वर्षानंतर पुन्हा नवापुरात बर्ड फ्लूचे थैमान -
2006 साली नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यामध्ये बर्ड फ्लूने थैमान घातले होते. त्यानंतर ज्या उपाययोजना केल्या गेल्या त्यातून पुन्हा हे संकट या तालुक्यांमध्ये येणार नाही असंच वाटलं होतं. मात्र तब्बल पंधरा वर्षानंतर पुन्हा बर्ड फ्लूने या तालुक्याला वेढा घातला आहे. या संकटामुळे या तालुक्यामध्ये बेरोजगारी वाढणार आहे. पोल्ट्री व्यवसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असून तालुक्याची अर्थव्यवस्था खिळखिळी होणार आहे.
पशुसंवर्धन विभागातर्फे उपाययोजनांचा अभाव -
नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर तालुका पोल्ट्री हब म्हणून ओळखला जातो. शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाह या व्यवसाय वरती असतो. मात्र 2006 नंतर आता पुन्हा या व्यवसायाला बर्ड फ्लूने आपल्या मगरमिठीत घेतले आहे. विशेष म्हणजे 2006 नंतर या ठिकाणी बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना होणे अपेक्षित होते, मात्र त्या उपाय योजना अंमलात आल्याचे दिसून येत नाही. पशुसंवर्धन विभाग या ठिकाणी नावाला दिसून येतो. पोल्ट्री व्यावसायिकांनी ही केलेल्या तडजोडी आणि लपवलेली माहिती बर्ड फ्लूच्या उद्रेकाला कारण ठरले आहे. आता प्रशासनाला दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून या ठिकाणी लाखो कोंबड्या नष्ट कराव्या लागणार आहेत.
नवापूर तालुक्याची अर्थव्यवस्था बिघडण्याची शक्यता -
वीस हजार पेक्षा जास्त कोंबड्या याठिकाणी मरतात आणि त्याची माहितीही पशुसंवर्धन विभागाला नसते, हे दुर्दैव म्हणावे लागेल. निनावी पत्र आलं नसतं तर प्रशासनाला या उद्रेकाची माहितीच मिळाली नसती. आता बर्ड फ्लूचा उद्रेक झालेला आहे. पोल्ट्री व्यावसायिकांनी थोडे नुकसान टाळण्यासाठी मोठे नुकसान करून घेतले आहे. या तालुक्याची अर्थव्यवस्था इतक्यात सुधारेल असे दिसून येत नाही. ज्या पोल्ट्री व्यवसायावर शेकडो कुटुंबे निर्भर आहेत. त्यांना बेरोजगारीचा आणि आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
पशुसंवर्धन आयुक्तांची भेट -
नवापुर तालुक्यातील डायमंड पोल्ट्री येथे नाशिक विभागातील पशु आयुक्त सचिंद्र सिंह यांनी पाहणी करून पोल्ट्री व्यावसायिक व अधिकाऱ्यांशी बर्ड फ्ल्यू संदर्भात मार्गदर्शन केले. व्यवसायिकांनी शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई कमी असल्याने योग्य दरात भरपाई मिळावी, अशी मागणी आयुक्तांसमोर केली.