नंदुरबार - नवापूर येथे दीड एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन पडलेल्या ठिणगीमुळे उसाच्या शेताला आग लागली होती. यावेळी मजुरांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. नवापूर येथील अग्निशमन बंब दाखल झाल्याने तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
कशी लागली आग?
गुजरात राज्यातील खाबदा येथील रहिवासी सीमाबाई फत्तेसिंग गावित यांचे नवापूर तालुक्यातील पांघराण शिवारात नवापूर-आमलाण रस्त्याजवळ शेत आहे. या शेतातून नवापूरहून आमलाणकडे विद्युत वाहिनी गेली आहे. या विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन घर्षण झाल्याने विद्युत ठिणगी शेतातील उसावर पडली आणि काही क्षणात उसाने पेट घेतला. उसाच्या शेताला आग लागल्याचे कळताच परिसरातील शेतमजुरांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररुप धारण केले. शेतमालक सीमाबाई फत्तेसिंग गावित आणि अमर फत्तेसिंग गावित हे दोघे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अमर गावित यांच्या हाताला दुखापत देखील झाली.
काही वेळात नवापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने शेतातील आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवले. या आगीत लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाला आहे. सुमारे सात एकरापैकी दीड एकर ऊस आगीत खाक झाला असून महसूल विभागाने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतमालक सीमाबाई गावित यांनी केली आहे.