नंदुरबार - दरवर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा होतो. नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने नवरात्रीसाठी या ठिकाणी अनेक मूर्तीकार देवीच्या मूर्ती साकारत असतात.
मात्र यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट असल्याने मूर्ती विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. यंदा दर वर्षीच्या तुलनेत सणांचा जल्लोष ओसरणार असल्याचे चित्र आहे. तसेच मूर्ती विक्रेत्यांना नेहमीप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाने दोन फूटांहून मोठी मूर्ती न बसवण्याचे आदेश काढल्याने मूर्ती विक्रेते संकटात सापडले आहेत.
श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र व गुजरात सीमावर्ती भागात मोठ्या उत्साहात दशा माता उत्सवाला सुरुवात होते. या उत्सवादरम्यान महिला व पुरुष दहा दिवसांचा उपवास करून अकराव्या दिवशी त्याचे विसर्जन करतात.
यंदाचा उत्सव तोंडावर आल्यानंतरही मूर्तींना मागणी नसल्याने ५० टक्के घट झाली आहे. शहरात अनेक मूर्ती बनवण्याचे कारखाने आहेत. मजूरांचे पगार तसेच कारखान्याचा खर्च भरून काढणे मालकांसमोर आव्हानात्मक झाले आहे.