नंदुरबार - नवापूर तालुक्यात लाकुड तस्करीचा खेळ सुरुच आहे. वनविभागाने छापा टाकुन सावरट येथे एका आयशर वाहनातुन लाकुडसाठ्यासह तब्बल 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या महिन्याभरापासून लाकुड तस्करांवर नवापूर वनविभागाकडुन कारवाई सुरु आहे.
नवापूर तालुक्यातील वावडी (सावरट) येथे अवैध लाकुडसाठा आयशर वाहनातुन नेला जात असल्याची माहिती नवापूर वनविभागाच्या पथकाला मिळाली. पथकाने वावडी छापा टाकला त्यावेळी आयशर वाहन संशयितरित्या उभे आढळले. या वाहनाची तपासणी दरम्यान ताज्या तोडीचे खैर, साल काढलेले सीसम लाकुड आढळले. सदर वाहनचालक वाहन सोडुन पसार झाला होता. यावेळी पथकाने वाहनातील लाकुड साठ्यासह 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर लाकुडसाठा व वाहन नवापूर शासकीय विक्री आगारात पथकाने जमा केली. ही कारवाई वनसंरक्षक धुळे, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा, विभागीय दक्षता अधिकारी धुळे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार) यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रशांत हुमने, खांडबार्याचे वनपाल पवार, डी.के.जाधव, वनरक्षक संजय बडगुजर, प्रशांत सोनवणे, कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, सतिष पदमोर, नितीन पाटील, लक्ष्मण पवार, किसन वसावे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.