नंदुरबार -लॉकडाऊन सुरू असताना ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी बसवून त्यांना घेऊन जाताना मास्क न वापरणाऱ्या दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. विनामास्क फिरणाऱ्या चौघांविरुध्दही कारवाई करण्यात आली आहे.
नंदुरबारहून सुरतकडे ट्रॅव्हल्सद्वारे प्रवासी घेऊन जाण्यात येत होते. तालुका पोलिसांनी ढेकवद गावाजवळ ट्रॅव्हल्सला अडवत तपासणी केली असता चालक व सहचालकाने मास्क घातला नसल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल पद्मसिंग गिरासे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार समाधान पुंडलिक भोई (रा.दोंडाईचा), किरण सुभाष पाटील (रा.चौबारे) या दोघांविरुध्द भादंवि कलम 288, 279, 290 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) सह साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 2, 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहर व उपनगर पोलिसांनी विनामास्क फिरताना आढळलेल्या तीन जणांवर कारवाई केली आहे. नंदुरबार येथे काझी तमीजोद्दीन हबीबोद्दीन हे विनामास्क फिरताना सापडले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल धिरज कोमलेकर यांच्या तक्रारीवरुन काझी तमीजोद्दीन हबीबोद्दीन यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे हर्षल बागल यांच्या तक्रारीवरुन कमाल रामेशलाल लालवाणी तर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोलंकी व पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरुन संदिप महादेवराव पाटील (रा.निंभेल), सुभाष ताराचंद पाटील (रा.घोटाणे) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.