नंदुरबार - बांधकाम ठेकेदाराकडून 85 हजाराची लाच स्वीकारणार्या जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नंदुरबार जि.प.बांधकाम उपविभागातील उपविभागीय अधिकारी अभियंता बबन काशिराम जगदाळे हे लाच प्रकरणात सापडल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.
एका बांधकाम ठेकेदाराने नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्या पिंप्रीपाडा येथे रस्ता दुरूस्तीची कामे केली होती. या शासकीय कामांचे ठेके घेऊन ते पूर्ण केल्याने सर्व कामांचा मोबदला रुपये 44 लाख ठेकेदाराला मिळाला आहे. या 44 लाखाच्या कामाच्या मोबदल्यात नंदुरबार जि.प.बांधकाम उपविभागातील उपविभागीय अधिकारी अभियंता बबन जगदाळे यांनी ठेकेदाराकडे 2.5 टक्के लाच मागितली होती.
जगदाळे याने त्यानुसार 1 लाख 5 हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी 20 हजार रुपये दोन दिवसांपूर्वीच घेतले होते. याप्रकरणी ठेकेदाराने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने सापळा लावण्यात आला होता.
नंदुरबार येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कार्यालयात ठेकेदाराकडून राहिलेल्या 85 हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपविभागीय अधिकारी अभियंता बबन जगदाळे यांना पथकाने रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासणे, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबारचे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिरराव, हेड कॉन्स्टेबल उत्तम महाजन, संजय गुमाने, मनोहर बोरसे, पोलीस नाईक दिपक चित्ते, संदिप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली.