नंदुरबार - सर्वसामान्य लोकांच्या प्रवासाचे साधन म्हणून ओळखली जाणारी 'लालपरी' लॉकडाऊन केल्यापासून बंद आहे. अनेक दिवसांपासून बसेस बंद स्थितीत उभ्या असल्याने बॅटरी आणि इंजिन ऑईल खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगारातील बसेस जागेवर सुरू करून ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील चारही आगारात बसेस उभ्या आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा आल्यास त्या ठिकाणी बसेसची गरज भासल्यास उभ्या असलेल्या बसेसमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून बसेस बंद असल्यामुळे त्यांची बॅटरी उतरणे व इंजिन ऑइल खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून दर २ ते ३ दिवसानंतर बस 15 ते 20 मिनिटे सुरू करून ठेवण्यात येतात. जेणेकरून लॉकडाउन उघडल्यानंतर बसेस त्वरित सुरू होतील. याची दक्षता एसटी महामंडळाचे कर्मचारी घेत आहेत. तसेच बसेसची योग्य ती दुरुस्ती करून तयार ठेवत असल्याची माहिती मंडळाच्या कर्मचार्यांकडून देण्यात आली.