नंदुरबार - जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील विसरवाडी, नवापूर, शहादा या तालुक्यांमध्ये कडकडीत बंद असून धडगाव व अक्कलकुवा येथे संमिश्र प्रतिसाद दिसून आला. तर नंदुरबार शहरात मात्र काही ठिकाणी व्यापारी प्रतिष्ठाने सुरू होती. शहरातील विविध संघटनांकडून बंदच्या पार्श्वभूमीवर निदर्शने करण्यात आली असून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शहरात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद -
नंदुरबार शहरात काही व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. तर, काही व्यापार्यांनी आपले व्यवहार सुरळीत ठेवले होते. त्याचबरोबर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवल्याने मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट दिसून आला.
शहादा, नवापूर तालुक्यात कडकडीत बंद -
जिल्ह्यातील शहादा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी विविध संघटनांच्यावतीने व्यापाऱ्यांना आव्हान करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले. तर, नवापूर तालुक्यातदेखील बंद पाळण्यात आला होता. तालुक्यातील नवापूर शहर, विसरवाडी व खांडबारा या मोठ्या बाजारपेठांमध्ये व्यवहार बंद होते.
सर्वपक्षीय रॅली -
नंदुरबार शहरात सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने रॅली काढण्यात आली होती. भारत बंदला प्रतिसाद द्या, असे आवाहन या रॅलीतून करण्यात आले होते. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त -
सर्वपक्षीय नेत्यांनी 'भारत बंद'ला पाठींबा दिल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील प्रत्येक चौकात व तालुक्यातील संवेदनशील भागात जिल्हा पोलीस दलाच्यावतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच एस.आर.पी.एफ. च्या दोन तुकड्या बंदोबस्तात तैनात होत्या.
हेही वाचा - 'नाक दाबा, सरकार बरोबर तोंड उघडेल'; भारत बंदला अण्णा हजारेंचा पाठिंबा