नंदूरबार - नवापूर शहरातील सर्वात मोठी शोली पोल्ट्रीतील कोंबड्यांचा अहवाल बर्डफ्लू पॉझिटीव्ह आल्याने कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. शोली पोल्ट्रीत साधारण २ लाख ३७ हजार कोंबड्या आहेत. तर ३० लाख अंडी आहेत. काही दिवस आधी शहरातील शोली पोल्ट्रीतील कोंबड्या भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आल्या होत्या. त्यांचा अहवाल बर्डफ्लू पॉझिटीव्ह आल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत शोली पोल्ट्रीतील सर्व कोंबड्या या टप्प्याटप्प्याने नष्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या चार दिवसांत शोली पोल्ट्रीतील या कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहे.
नवापूरातील एकूण ६ लाख कोंबड्या नष्ट -
गेल्या एक महिन्यापासून नवापूर तालुक्यात बर्डफ्लू संसर्ग आजाराने थैमान घातल्याने राज्यातील सर्वात मोठे कलिंग ऑपरेशन नवापूर तालुक्यात सुरू आहे. एकूण २९ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीतील जवळपास ६ लाख कोंबड्या नष्ट करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या कोंबड्यांचे खाद्यदेखील प्रशासनाने नष्ट केले आहे.
पुन्हा चार पोल्ट्री फार्मचा अहवाल पॉझिटीव्ह -
नवापूर शहरातील चार पोल्ट्रीतील अहवाल पॉझीटीव्ह आल्याने पेरानीयार, पॅराडाईज, रीची आणि अशरफ या चार पोल्ट्रीमधील एकूण ५१ हजार १०० कोंबड्या व अंडी व नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
पोल्ट्री मालकांचे करोडोचे रुपयांचे नुकसान -
नवापूर तालुक्यात आतापर्यंत एकूण २९ कुक्कुटपालन केंद्रातून ६ लाख ५१ हजार ३०३ कोंबड्या व २७ लाख अंडी बर्डफ्लूमुळे नष्ट करण्यात आले आहेत. नवापूर तालुका बर्ड फ्लूचा महाराष्ट्र राज्यातील मोठा हाॅटस्पाट ठरला आहे. नवापूर तालुक्यातील बर्डफ्लूचे लोन थेट गुजरातसह नंदुरबार जिल्ह्यातील इतर तालुक्यातदेखील पसरले आहे. नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय सुरू होता परंतु बर्डफ्लूचा शिरकावाने पूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला आहे. २९ पोल्ट्री व्यवसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचाा - मुंबई: अश्लील प्रँक व्हिडिओमधून ४ महिन्यात २ कोटींची कमाई; तीन यूट्यूबरला अटक