नंदूरबार - शाळकरी मुली मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या गैरसोईला घाबरून शाळेत जाणे टाळतात. परीक्षेच्या कालावधीतही त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. ही बाब लक्षात घेत शहादा येथील माहेश्वरी महिला मंडळाने शाळेतच मुलींना सॅनिटरी नॅपकिनची सुविधा पुरवण्याचे महत्वाचे काम हाती घेतले आहे.
मंडळाद्वारे अत्यंत कमी खर्चात सॅनिटरी नॅपकिनचे मशीन उपलब्ध करून देण्यात येते. देखभालीचा खर्च जास्त असल्याचे लक्षात घेऊन भविष्यात मशीन बंद पडणार नाही याची सोयही मंडळाने केली आहे. सुरुवातीला मशीनमध्ये १०० नॅपकिन या महिलांकडून मोफत दिले जातात. जेणेकरून, त्यातून येणाऱ्या पैशांमध्येच नंतर मशीनमध्ये पॅड रीफील केले जातील.
मशीनमधून नॅपकिन कसा उपलब्ध करावा याचे प्रशिक्षणही मुलींना देण्यात येते. केवळ पाच रुपयांचे नाणे या मशीनमध्ये टाकून एक नॉब फिरवल्यानंतर आऊटलेटमधून नॅपकिन बाहेर येतो. हे मशीन स्वयंचलित असल्याने मशीन चालू-बंद करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरजही पडत नाही.
या मशिनची किंमत ३६०० रुपये आहे. आत्तापर्यंत या महिला मंडळाकडून देणगीदारांनी तीन मशीन खरेदी करून विविध शाळांना भेट म्हणून दिली आहेत. स्वयंसेवी संस्था आणि देणगीदारांनी मासिक पाळीदरम्यान होणारे मुलींचे शैक्षणिक नुकसान कमी करण्यासाठी हातभार लावावा आणि हे मशिनची खरेदी करून शाळांना द्यावे, असे आवाहन माहेश्वरी महिला मंडळाने केले आहे.