नंदुरबार - वनजमिनींच्या हक्कांसाठी लोकसंघर्ष उलगुलान (अन्यायाविरुद्ध विद्रोही चळवळ) मोर्चा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कार्यालयापासून बऱ्याच अंतरावर हा मोर्चा पोलिसांनी बॅरिकेट्स लावून अडवल्याने मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे आणि पोलीस अधिकार्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर हे बॅरिकेट्स हटवून मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करू देण्यात आली.
हेही वाचा - भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर आजच होणार कारवाई...
लोकसंघर्ष मोर्चाने वनजमिनींचे हक्क वनदावेदारांना मिळावे आणि प्रलंबित वनदावे मंजूर व्हावे, यासह अनेक मागण्यांसाठी उलगुलान मोर्चाची हाक दिली होती. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा महाराणा प्रताप पुतळा, बस स्थानक, नेहरू चौक, जुनी नगरपालिका, शास्त्री मार्केट, हुतात्मा चौक, गणपती मंदिर, सोनारखुंट, टिळक रोड, साक्रीनाका, नवापूर चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.