नंदुरबार - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आठ दिवसांची कडक संचारबंदी लागू केल्याने जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा व नवापूर ही चार शहरे लॉकडाऊन झाली आहेत. लॉकडाऊन केल्याने चारही शहरांमध्ये शासकीय कर्मचारी व पोलीस वगळता कोणीही फिरकले नाही. यामुळे रुग्णालये व औषध विक्रीची दुकाने वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवले आहेत, तर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई देखील केली आहे.
जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे ही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असल्याने संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 23 ते 30 जुलै असे आठ दिवस कडक संचारबंदी चारही शहरांमध्ये लागू केली आहे. मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू झाल्याने शहरांच्या प्रवेशद्वारांवर बॅरिकेट्स लावून प्रवेश बंद करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त तैनात आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूर या चारही शहरांमध्ये संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली. या संचारबंदीतून शासकीय व बँक कर्मचार्यांना वगळण्यात आल्याने शहरांच्या प्रवेशद्वारांच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या पोलीसांनी प्रत्येकाची विचारपूस केली. विनाकारण शहरात जाणार्यांना तंबी देवून घरी पाठविले, तर शासकीय कर्मचार्यांच्या ओळखपत्रांची पडताळणी करुन शहरात प्रवेश देण्यात आला.
सकाळी 7 ते 9 यावेळेत दूध व वृत्तपत्र विक्रेत्यांना मुभा असल्याने त्यांनी आपली कामे आटोपून 9 वाजेच्या आत आपापल्या घरी पोहोचले. त्यामुळे रुग्णालये व मेडीकल वगळता सर्वच व्यवहार बंद होते. शहरातील प्रत्येक भागातील दुकानांना कुलूप असल्याने जिल्ह्यातील चारही शहरे संपूर्ण लॉकडाऊन झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच संचारबंदीत शहरातील पेट्रोलपंप केवळ शासकीय कर्मचार्यांसाठी सुरू ठेवण्याचे आदेश असल्याने पेट्रोलपंपांवर दिवसभर शुकशुकाट दिसून आला. नंदुरबार शहरातील मंगळबाजार, सुभाष चौक, शास्त्रीमार्केट, तुप बाजार, नगरपालिका परिसर, दिनदयाल चौक, महाराणा प्रताप चौक, बसस्थानक, नेहरू पुतळा, मोठा मारुती मंदिर परिसर, जळका बाजार, धुळे नाका, कोरीटनाका, सिंधी कॉलनी, धानोरा नाका या प्रमुख चौकांसह भाजीपाला व धान्य मार्केटमध्येही शुकशुकाट होता.
दरम्यान, पोलिसांसह पालिकेच्या नियुक्त पथक शहरात गस्त घालत आहेत. या कडक संचारबंदीला जिल्ह्यातील चारही शहरांमध्ये प्रतिसाद मिळाला. दरम्यान, संचारबंदीत विनाकारक फिरणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली. तसेच शहादा, तळोदा व नवापूर या शहरातही संचारबंदीने सर्वच व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून आले.