नंदुरबार - केंद्र सरकारने आणलेल्या नविन कृषी कायद्याविरोधात देशव्यापी 'भारत बंद'ला पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण शेतकरी कष्टकरी सभेच्यावतीने शहरातून भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला. नवापूर तालुक्यातुन मोर्चेकरी मोटारसायकल रॅलीद्वारे नंदुरबार शहरात दाखल झाले. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नेहरू चौकात मोर्चेकऱ्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. तर आंदोलनानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदन सादर करण्यात आले.
नवापूर ते नंदुरबार मोटर सायकल रॅली -
भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण कष्टकरी सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लाल बावटा संघटनेच्यावतीने नवापूर येथून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 200पेक्षा अधिक मोटारसायकली आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मोटार सायकल रॅली नावपूर येथून विसरवाडी खांडबारा मार्गे नंदुरबार शहरात पोहोचली.
हेही वाचा - ... तर आम्ही आरक्षण सोडायला तयार, रामदास आठवलेंचे मोठे विधान
शहरातील मध्यवर्ती भागात ठिय्या आंदोलन -
मोटर सायकल रॅली शहरातील तालुका क्रीडा मैदानात दाखल झाल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी मोर्चाला सुरुवात केली. मोर्चात कष्टकरी संघटनेतील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सुमारे दोन तासांहून अधिक काळ नेहरू चौकात घेराव घालत शेतकऱ्यांनी ठाण मांडत केंद्राने पारीत केलेले तीनही कायदे शेतकरीविरोधी असून, हवा तर हमी भावाचा कायदा पारित करा, असे सांगत तीनही कायदे रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन -
सुमारे दोन तास शहरातील मध्यवर्ती भागातील नेहरू चौकात आंदोलनानंतर पुन्हा बाईक रॅलीद्वारे जिल्हाधिकार्यालय पोहोचत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना या कायद्याविरोधात निवेदन देण्यात आले. हा कायदा रद्द झाला नाही तर वेळप्रसंगी दिल्ली गाठण्याचा इशाराही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे.