नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यातील गर्भवती मातांची प्रसुती सामान्यपणे करण्याऐवजी सीझर शस्त्रक्रियेद्वारे केली जात आहे. त्यामुळे सीझर करून बाळांना जन्म देण्याच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवभरात 15 पैकी 5 मातांचे सीझेरियन प्रक्रियेने प्रसुती होत आहे. याविरुद्ध खासगी रुग्णालयात सामान्य पद्धतीने बाळांचा जन्म होण्यास प्राधान्य दिले जात आहे. यातून जिल्ह्यातील 16 नर्सिंग होममध्ये दिवसभरात सरासरी एक, तर अपवाद वगळता एकापेक्षा अधिक सीझर प्रक्रिया होत आहे.
हेही वाचा - गायी शिकार केल्याने बिबट्याला विष देऊन मारले, चौघांची वनकोठडीत रवानगी
जिल्ह्यात सीझेरियन होण्याची प्रमुख कारणे
जिल्ह्यात सीझेरियन होण्याचे प्रमुख कारण म्हणजे बाळाचे वजन अधिक असणे, डोके मोठे असणे, मातेच्या शरिरातील गुंतागुंतीचे बदल, गर्भाशयातील अडचणी, या सर्व बाबींचा विचार करून सीझर करण्याबाबत निर्णय घेतला जात आहे. जिल्हा रुग्णालयात सीझर होणाऱ्या बहुतांश माता या ग्रामीण भागातील असल्याचे धक्कादायक सत्य यात समोर आले आहे. कमी वयात होणारे विवाह, शारीरिक कमकुवतपणा, ऐन गर्भधारणेत न मिळालेले पोषण यातून मातांना सीझरला सामोरे जावे लागत आहे. मातेच्या पालकांसह सासरच्यांकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर सीझर शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांकडून देण्यात आली.
शारीरिक कारणांमुळे निर्णय
जिल्हा रुग्णालयात सिझर करण्यासाठी सर्व सुविधा आहेत. मातेच्या गर्भातील बाळाच्या हालचाली न होणे, नाळ अडकणे, बाळाचे वजन अधिक किंवा डोके मोठे असणे आदी कारणे आढळून आल्यास सीझर करण्याचा निर्णय घेण्यात येतो. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने माता प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होतात.
सीझर का वाढले?
जिल्ह्यातील ग्रामीण भागात खासगी, ग्रामीण रुग्णालये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सीझेरियन करण्याची व्यवस्था नाही. गर्भातील बाळाच्या स्थितीनुसार आणि मातांच्या प्रकृतीवरून सीझरचे निर्णय घेतले जाते. दुर्गम भागातून येणाऱ्या बऱ्याच गर्भवती मातांचे वय कमी असणे, वजन कमी असणे, उंची कमी असणे यासह इतर शारीरिक अडचणींमुळे प्रसुतीत अडचणी येत असल्याची माहिती स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी दिली.
तसेच, गर्भवती मातांच्या शारीरिक क्षमता आणि मागील बाळंतपणाच्या माहितीवरून सीझर करण्याचा निर्णय घेतला जातो. बाळाचे डोके मोठे असणे आणि बाळाने गर्भात विष्ठा करणे यातून अडचणी वाढल्यानंतर सीझर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. यासाठी पालकांची संमती घेतली जाते, अशी माहिती स्त्रीरोग तज्ञ डॉ. भावना वळवी यांनी दिली.
हेही वाचा - नागपुरात संचारबंदी लागू होताच पोलीस तैनात; आयुक्तांनी केली पाहणी