नंदुरबार - तापी नदीमधून नंदुरबार जिल्हात मोठ्या प्रमाणात वाळू उपासा केला जातो. त्याचा लिलाव करून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात वाळू वाहतूक केली जाते. बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळूची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता, ती जिल्हा सीमा आणि जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले होते. असे असतानाही वाळू माफियांचा मनमानी कारभार सुरुच होता. याविरोधात कारवाई करत गुजरात राज्यातील निझर येथून वाळू घेऊन जात असलेले 13 ट्रक नवापुर पोलिसांनी नवरंग रेल्वे गेटजवळ पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहेत.
हेही वाचा... वादळाने उद्ध्वस्त झालेले बाबासाहेबांचे गाव अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत
गुजरात राज्यातुन औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, पुणे, लातूर याठिकाणी वाळूचे भरलेले ट्रक जात असताना हि कारवाई करण्यात आलेली आहे. रेड झोनमधील वाहनांना नंदुरबार जिल्ह्यात बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. वाळूच्या वाहतूकीमुळे जिल्ह्यात रस्त्यांची दुरावस्था होते. वाहतूक करतांना अधिक वेगाने वाहतूक होत असल्याने सामान्य नागरिकांचा रोष वाढला आहे.
तळोदा-नंदुरबार मार्गावर वाळू वाहतूकदारांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्याऐवजी अडथळा होईल, अशी परिस्थिती निर्माण केली होती. या बाबी लक्षात घेता वाळू वाहतूकीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूक बंदी करण्यात अली आहे.