नंदुरबार - धडगाव-चिचखेडी रस्त्याने अवैधरित्या वाहतूक होणारा मद्यसाठा नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून ७ लाख २८ हजारांच्या मद्यसाठ्यासह एक पिकअप वाहन, एक दुचाकी आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा - नंदुरबार: तीनखुन्या परिसरात साडेसहा लाखांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त
धडगाव तालुक्यातील धडगांव-चिचखेडी रस्त्याने जलोला शिवारातून अवैध विदेशी मद्य आणि बिअरचा साठा वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक युवराज राठोड यांनी खेडदिगर सीमा तपासणी नाक्याच्या पथकासोबत जलोला शिवारातील रस्त्यावर सापळा रचला. यावेळी पिकअप गाडी (क्र.एम.एच.३९ सी.७७३६) ची तपासणी केल्यावर त्यामध्ये अवैध मद्यसाठा आढळून आला. त्यात १७९ बॉक्समध्ये असलेला ७ लाख २८ हजार ६०० रुपये किंमतीचा अवैध विदेशी मद्यसाठा मिळून आला.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये 4 लाखांचा विदेशी मद्याचा अवैध साठा जप्त
या कारवाईत पिकअप वाहनासह एक दुचाकी (क्र.एम.एच.१४ एफ.बी.१३७५), सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल आणि मद्यसाठ्यासह एकूण ११ लाख ७८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी केशव खाज्या पाडवी, संजय धर्मा पाडवी (दोघे रा.खांडबारापाडा खुंटामोडी ता.धडगांव) या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून दोन्ही संशयितांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबारचे अधिक्षक युवराज राठोड, खेडदिगर सिमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक ए.पी.शिंदे, बी.एस.चोथवे, जवान हंसराज चौधरी, भुषण चौधरी, मानसिंग पाडवी, राजेंद्र पावरा, मोहन पवार, रामसिंग राजपूत, तुषार सोनवणे यांच्या पथकाने केली.