नंदूरबार - लोकसभा मतदारसंघात निवडणुककाळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १५ दिवसांत अवैध दारू साठा आणि बेकायदेशीररित्या वाहतूक केला जाणारा मध्यप्रदेश बनावटीचा २६ लाख ८१ हजार ७२६ रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूक काळात मतदारांना देण्यासाठी मद्याचा वापर होऊ शकतो, हे लक्षात घेता निवडणूक जिल्हा प्रशासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांची नियुक्ती केली होती. या पथकांमार्फत मध्यप्रदेश सीमेवर आणि जिल्हाभरात धडक कारवाई करत जवळपास २७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आचारसंहिता काळात ८७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुजरात राज्यात दारूबंदी आहे. तर नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याचा सीमावर्ती भागात आहे. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जाते. ही बाब लक्षात घेत वर्षभर कारवाया करण्यात याव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.