नंदुरबार - नवापूरकडून गुजरातकडे अवैधरित्या तीन अॅपेरिक्षांमधून वाहतूक होणारा साडेचार लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. यावेळी मुद्देमालासह तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई नवापूर येथे नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.
हेही वाचा - मुंबई : दहिसर येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा
नवापूरमार्गे गुजरात राज्यात अॅपेरिक्षातून अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने नवापूर तालुक्यातील वाकीपाडा गावाच्या पुलाजवळ 10 डिसेंबरला सापळा रचला. यावेळी नवापूरकडून गुजरात राज्यात एका पाठोपाठ तीन अॅपेरिक्षा वेगाने जाताना संशयितरित्या आढळल्या. त्यामुळे पथकाने अॅपेरिक्षांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर चालकांनी वाहन न थांबवता भरधाव वेगाने पुढे निघून गेले.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून तीन अॅपेरिक्षांना थांबवून चौकशी केली. त्यावेळी त्यात मद्यसाठा आढळून आला. सुरुवातीला पोलिसांनी विचारणा केल्यावर संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, कर्मचार्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनी त्यासंदर्भातली माहिती दिली.
शोएब गुलाब बाबरीया (35, रा.भगतवाडी, नवापूर), अकील शेख महंमद (32, रा.नारायणपूर रोड, नवापूर), शेख साबीर शेख सत्तार (49, रा.देवळीफळी, ता.नवापूर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी या तिघांना अटक केली.
यावेळी अॅपेरिक्षात देशी-विदेशी अवैध दारू व बीअरचा मद्यसाठा मिळून आला. सदरची दारू नवापूर परिसरासह गुजरात राज्यातील लहान गावांमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली तिघा संशयितांनी दिली. यावेळी पथकाने अॅपेरिक्षांची तपासणी केल्यानंतर 1 लाख 2 हजार 336 रुपये किमतीच्या संत्रा देशी दारूच्या 1 हजार 768 काचेच्या बाटल्या, 46 हजार 376 रुपये किंमतीची विदेशी दारू, 26 हजार 400 रुपये किंमतीचे 216 बीअरचे टिन, 1 लाख 85 हजार किमतीचा अन्य मद्यसाठा व तीन अॅपेरिक्षा असा एकूण 4 लाख 60 हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - बनावट सिमेंट विकणाऱ्या ७ जणांना अटक; शहर पोलिसांची कारवाई
याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांसह मुद्देमाल नवापूर पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस महेंद्र नगराळे, पोलीस शांतीलाल पाटील, युवराज चव्हाण, पोलीस जितेंद्र तोरवणे, यशोदीप ओगले यांच्या पथकाने केली.