नंदुरबार - शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शहरातील माळीवाड्यात घर कोसळले. तर अनेक घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे लहान माळीवाड्यातील यादव माळी यांचे घर कोसळले. घराची पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. काही ठिकाणी विद्युत पोल पडल्याने काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
नंदूरबारमध्ये मुसळधार पावसामुळे घरांची पडझड जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तलाठी, मंडळ अधिकारी व तालुका स्तरीय अधिकाऱ्यांनी याबाबत आवश्यक ती खबरदारी घेवून मुख्यालय सोडू नये. जिल्ह्यातील नदीपात्रात पाण्याची पातळी वाढून पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे व योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.
तापीची पाणीपातळी वाढण्याचा इशारा
तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. येत्या 72 तासांपर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे धोकापूर्व पातळी 213 मीटर असून पाणी पातळी 213.08 मीटर एवढी असल्याने हतनूर धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येऊ शकतो. तसेच हवामान खात्याकडून पुढील तीन दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हतनूर आणि सुलवाडे बॅरेज धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. पुढील 72 तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे