नंदुरबार - जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रा अश्व बाजारासाठी ( Horse Market Sarangkheda ) प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रजातींच्या अश्वांची या ठिकाणी विक्री होत असते. यंदा "रावण" ( Ravan Horse ) ने अश्व बाजाराचे लक्ष वेधून घेतले आहे. नाशिकहुन सारंगखेडा घोडे बाजारात पहिल्यांदाच आलेल्या "रावण" घोड्याचे मालक असद सैयद यांनी एकूण १० घोडे विक्रीसाठी आणले आहेत. सर्वच दहाही घोडे देखणे व विशिष्ट आहेत. त्यांची किंमत देखील खूप महागडी ( Horse Price ) आहे. यातील "रावण" या घोड्याला पाच कोटी रुपयात मागितले आहे. मात्र मालकाने विक्रीस नकार दिला.
आतापर्यंत २७८ घोड्यांची विक्री -
देशभरात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथे यंदा केवळ अश्व बाजाराला परवानगी मिळाली. खरेदी-विक्रीसाठी जवळपास दोन हजारहून अधिक घोडे दाखल झाले आहे. गेल्या चार दिवसात २७८ घोड्यांची विक्री झाली असून तब्बल एक कोटीपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. सारंगखेडा येथील घोडे बाजारात नाशिकहुन दाखल झालेल्या रुस्तम, रावण, बुलंद नावाचे घोडे अश्व बाजाराचे आकर्षण ठरत आहेत. त्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. या अश्वांचे मालक असद सैयद यांनी आणलेल्या "रावण" घोड्याची तब्बल ५ कोटींची किंमत लावण्यात आली आहे. त्यामुळे रावण अश्व कोण विकत घेणार याची मोठी उत्सुकता आहे. मात्र मालकांनी विक्रीस नकार दिला आहे. त्याचप्रमाणे रुस्तम आणि बुलंद ( Rustam and Buland Horse ) या कोट्यवधी रुपये किमतीच्या घोड्यामुळे यंदा हा बाजार अधिकच लक्षवेधी ठरला आहे.
"रावण" घोड्यातील वैशिष्ट्य -
पूर्ण काळ्या रंगाच्या "रावण" अश्वाच्या कपाळावर पांढरा टिळा आहे. त्याला देवमन, कंठ, कुकड नाळ, नगाडा पुठ्ठा अशी शुभलक्षणे आहेत. अतिशय आकर्षक मारवाड जातीचा अश्व आहे.
रावण ची उंची ६८ इंच असून राज्यात सर्वात उंच घोडा असल्याच्या दावा मालकाकडून केला जात आहे. त्यामुळे त्याची कोट्यवधी रुपये किंमत असल्याचे घोडे मालक असद सैयद यांनी सांगितले. नाशिकहुन सारंगखेडा घोडे बाजारात पहिल्यांदाच आलेल्या रावण घोड्याचे मालक असद सैयद यांनी एकूण १० घोडे विक्रीसाठी आणले असून त्यातील बुलंद या घोड्याची किंमतही १ कोटी आहे. तर रुस्तम नावाच्या घोड्याची किंमत दीड कोटी आहे. पंजाब जातीच्या नुकरा घोड्याचे वय ३४ महिने आहे. पांढरा शुभ्र, शुभलक्षणे असल्याने हा घोडा आकर्षक ठरत आहे.
'रावण'ची दिवसाची खुराक
दिवसाला १० लिटर दूध, चणाडाळ, एक किलो गावरान तूप, पाच गावरानी अंडी, बाजरी, चोकर, सुका मेवा.