नंदुरबार - सातपुड्यातील डोंगर रागांमध्ये होळी सण अस्सल आदिवासी संस्कृतीला साजेसा असाच साजरा होतो. सातपुड्यात होळी उत्सव सात दिवस साजरा होतो. कोरोनाची भीती दूर सारत आनंदाने पारंपरिक नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांनी होळीचा उत्साह द्विगुणीत केला. ढोल, बासरी, शिट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपारिक पेहराव हा येथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होता. धडगाव तालुक्यातील आसली येथे होळी उत्सवात आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला.
हेही वाचा... कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच; सरकारची कबुली
संपुर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत निर्माण झाल्याने अनेक सण उत्सव रद्द केले जात आहेत. असे असताना नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या डोंगर रांगांमध्ये मात्र होळी उत्सवासाठी हजारो आदिवासी बांधव एकत्र येत आहेत. सातपुड्यातील आदिवासी बाधवांसाठी होळी सण वर्षातील सर्वात महत्वाचा असतो. या वर्षी देखील सातपुड्यात स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपारिक गीतांच्या सुरावर नृत्य करत आदिवासी बांधवांनी होळी साजरी केली.
आसली येथील होळी दिवसा पेटवली जाते, तर अन्य ठिकाणी होळी, ही रात्रभर नृत्य करत पहाटे पेटवली जाते. या होळी उत्सवात आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनीही पारंपरिक पेहरावात सहभाग नोंदवत ठेका धरला.
हेही वाचा... महिला दिनी विशेष: आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज अंशिकाला बनली एक दिवस पोलीस अधिकारी
होळी साजरी करताना आदिवासी संकृतीत पुरुष महिला, असा भेदाभेद राहत नाही. गरीब-श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नसते. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यात होळी साजरी करण्यात येते. कोणालाही विशेष आमंत्रण दिले जात नाही. की, कोणाला मानसन्मान दिला जात नाही. तरिही या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत उत्सवात सामील झाले होते.
होळीसाठी आपापल्या कला पथकांसह सामील होण्यासाठी सातपुड्यात पंधरा दिवस आधीपासून आदिवासी बांधवांनी तयारी केली होती. घुंगरू, मोरपिसांचा टोप, ढोलकी, मोठा ढोल, बासरी, शस्त्रे असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगाची नक्षीकाम करून होलिकोत्सवात सामील झालेले आदिवासी बांधव येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होते.
हेही वाचा... "100 दिवसांत सरकारने केवळ आमच्या चांगल्या कामांना स्थिगिती देण्याचे काम केले"
सातपुड्याच्या डोंगर रागांमध्ये आधुनिक शिक्षणाचे वारे वाहू लागले आहेत. पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. मात्र आधुनिक युगात आपले पाय भक्कम रोवताना आदिवासी समाज आपल्या संस्कृतीशी घट्ट नाळ बांधून आहे. हेच होळीचा हा सण आणि आदिवासींमध्ये असणारा उत्साह पाहिल्यावर लक्षात येते.