नंदुरबार- शहादा तालुक्यात भरधाव ट्रक विष्णु मंदिरावर धडकला. यामध्ये वाहन चालक गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. लांबाेळा गावात रस्त्याच्या बाजूला असलेल्या विष्णू मंदिरात सुसाट वेगाने येणारा सोळा चाकी ट्रक घुसल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहादा ते लांबोळादरम्यान तीन ठिकाणी ट्रक चालकाने शहादा शहराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना हुलकावणी दिली. मात्र, त्यापैकी शहरातील गुजर गल्लीतील वाहनाला ट्रक चालकाने कट मारल्याने वाहनाचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसान झालेल्या वाहनचालकाने ट्रकचा पाठलाग केला. त्यानंतर ट्रक चालकाने ट्रक सुसाट वेगाने चालवला. लांबाेळा गावाजवळ आल्यानंतर समोरुन अवजड वाहन आल्याने ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. व ट्रक सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या विष्णू मंदिरात घुसला.
अपघातात मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी जुने मंदिर पाडून नवीन बांधकाम करून जीर्णोद्धार करण्यात आला होता. दोन महिन्यापूर्वीच रंगकाम करण्यात आले होते. घटनेत मंदिराच्या सभागृहाचे व ट्रकचा पुढील भाग चक्काचूर झाला. शहादा पोलिसात रात्री उशिरा अपघाताची नोंद करीत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
विसरवाडी ते सेंधवा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र ठेकेदाराने ठिकठिकाणी धोक्याचे इशारा देणारे फलक लावलेले नाहीत. कदाचित फलक राहिला असता तर मंदिराचे नुकसान टळले असते. मंदिराचे साधारणतः दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.