नंदुरबार- कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने ऊसतोडीसाठी परराज्यात गेलेले मजूर आपल्या गावी परत येऊ लागले आहेत. नंदुरबार तालुक्यातील रनाळा आणि परिसरात 150 हुन अधिक मजूर कुटूंबिय गावी परतल्याने दक्षता म्हणुन या मजुरांची रूग्णालयात तपासणी करण्यात आली.
नंदुरबार तालुक्यातील रनाळा व ढंढाणे परिसरातील मजूर कुटूंबिय रोजगारानिमित्त ऊसतोडीसाठी परराज्यात गेले होते. परंतु, सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सर्वच व्यवहार बंद झाले असल्याने परराज्यात ऊसतोड करणारे मजूर आपापल्या गावी परत येत आहेत.
रनाळासह ढंढाणे परिसरातील 150 हुन अधिक मजूर परराज्यातुन आले आहेत. गावात पोहोचण्यापूर्वीच मनोहर हारु भिल यांच्यासह अन्य मजूरांनी शिवसेनेचे माजी सहसंपर्क प्रमुख दिपक गवते यांच्याशी संपर्क साधला. यावेळी गवते व मजूरांची चर्चा झाल्याने रनाळे येथील ग्रामीण रूग्णालयात मजूरांना तपासणीसाठी येण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार परराज्यातुन आलेले मजूर कुटूंबियांची रनाळा ग्रामीण रूग्णालयात तपासणी करुन त्यांना पुढील 15 दिवस घरातच राहण्याचे आवाहन शिवसेनेचे दिपक गवते यांनी केले आहे. तसेच संचारबंदीमुळे गावात विनाकारण फिरणार्यांनी कायद्याचे पालन करुन घरात राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.