नंदुरबार : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा प्रादुर्भाव गुजरात राज्यात पसरू नये, यासाठी गुजरात प्रशासनाच्या वतीने गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीमेवर एक आरोग्य पथक देखील नेमण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहनाची व वाहनचालकाची तपासणी करून, त्याच्याकडे असलेल्या अहवालाची पडताळणी करत वाहन चालकाची व प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. ज्या वाहन चालकांकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसेल त्यांना माघारी पाठवण्यात येत आहे.
कोरोना चाचणी अहवाल नसलेल्यांना गुजरात राज्यात प्रवेश बंदी..
महाराष्ट्र राज्यात दररोज कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने गुजरात सरकारकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जाणारे प्रवाशांची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. अहवाल नसल्यास परतीचा प्रवास करावा लागणार आहे. असे परिपत्रक गुजरात आरोग्य विभागाने काढले आहे. यावर गुजरात पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली आहे.
आरोग्य व पोलिस पथक तैनात..
उच्छल पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलीस दलाचे पथक तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांची तपासणी सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभाग व पोलिस दलाला देण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाची व प्रवाशांची थर्मल केंद्राद्वारे चाचणी करण्यात येत आहे. तसेच पोलिसांतर्फे मास्कविना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
अहवाल निगेटिव्ह असला तरच राज्यात प्रवेश..
महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनातील प्रवाशाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यावरच गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे. अन्यथा महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छलहून महाराष्ट्रात परत पाठविण्यात येत आहे. गुजरात राज्यातील आरोग्य पथक 24 तास सीमावर्ती भागात वाहन चालकाची थर्मल स्कॅनिंग, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचा तपास करीत आहे.ट
गुजरात पोलिसांकडून दंडात्मक कारवाई..
तोंडाला मास्क नसल्यास गुजरात पोलीस एक हजार रूपयांचा दंड महामार्गावर वसूल करीत आहे. महाराष्ट्र पासिंग फोर व्हीलर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यातील अनेक वाहनचालकांचे कुठलेही कारण ऐकून न घेता परतीचा प्रवास करण्यास सांगण्यात येत आहे.
नवापूर सीमा तपासणी नाक्यावर रॅपिड टेस्टिंग सुरू करण्याची मागणी..
गुजरात राज्यात जाण्यासाठी कोरोना रॅपिड किंवा आरटीपीसीआर तपासणी अहवाल असणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिक मोठ्या संख्येने गुजरात राज्यात कोरोनाचा उपचारासाठी जात असल्याने त्यांची मोठी अडचण होणार आहे. नवापूर सीमा तपासणी नाक्यावर रॅपिड टेस्टिंग चे कॅम्प लावण्याने गुजरात राज्यात जाणाऱ्यांची सोय होईल, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा : दारुऐवजी पिले सॅनिटायझर; आंध्रामधील दोन तळीरामांचा मृत्यू