नंदुरबार - राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते गावात 45 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरण करणाऱ्या नंदुरबार तालुक्यातील सिंदगव्हाण, नवापुर तालुक्यातील सागाळी आणि शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर या तीन ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा अधिकारी उपस्थित होते.
लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम -
नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाबाबत विविध प्रकारच्या अफवा व नागरिकांमध्ये गैरसमज पसरविण्यात आले होते. गैरसमज दूर करण्यासाठी खुर्द जिल्हाधिकाऱ्यांनी खानदेशी भाषेत ऑडिओ क्लिप सादर केल्या, त्याचबरोबर शिक्षण विभाग आरोग्य विभाग यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी अथक प्रयत्न केले. नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यात काही प्रमाणात जिल्हा प्रशासन यशस्वी होताना दिसून आले.
जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये 45 वर्षे नागरिकांचे 100 टक्के लसीकरण -
नंदुरबार तालुक्यातील सिंदगव्हाण ग्रामपंचायतीने 45 वर्षावरील 431 नागरिकांचे, सागाळी गावाने 331 आणि पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायतीने 337 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले. या ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी आणि मुख्याध्यापक यांना प्रातिनिधिक स्वरूपात गौरवण्यात आले.
लसीकरणाचे महत्त्व सांगितले समजावून -
शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथे नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून लसीकरण न केलेल्यांची माहिती घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले. त्याचबरोबर नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी विविध प्रयोग केल्याचे सरपंच ज्योती पाटील यांनी सांगितले.
घरोघरी जाऊन नागरिकांशी साधला संवाद -
नवापूर तालुक्यातील सागाळी ग्रामपंचायतीत घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणावर अप्राप्त वसवण्यात आली होती. त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच यांसह सर्व सदस्यांनी ग्रामस्थांची गैरसमज दूर करून लसीकरणासाठी घेण्यासाठी आव्हान केले. सागाळी येथील पहिल्या शिबिरात केवळ 131 जणांचे लसीकरण झाले. लसीकरण न करणाऱ्यांना इतर गावातील शिबिराला भेट देण्यासाठी नेले. लसीकरणानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारपूस केल्याने लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि त्यांचा हुरूप वाढला असे सागाळी येथील सरपंच संजय कामडे यांनी सांगितले.
या तीनही ग्रामपंचायतीचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक -
या तिन्ही ग्रामपंचायतींची कामगिरी इतरांना प्रेरक आहे. येथील सरपंच, मुख्याध्यापक, ग्रामसेवक यांनी परिसरातील इतर गावानाही लसीकरण वाढविण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे यावेळी ॲड. के. सी. पाडवी यांनी सांगितले. एकाच दिवसात 813 जणांचे लसीकरण करणाऱ्या दुर्गम भागातील भगदारी गावातील लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि नागरिकांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांची उपस्थिती -
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार डॉ. हिना गावीत, जि. प. अध्यक्ष सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते.