नंदुरबार- लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील मजुरांवर बेरोजगारीची परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे, आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व आदिवासी जमातीतील मजुरांना भोजनाची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले धान्य खुल्या बाजारात न विकता आदिवासी मजुरांना वाटप करण्यात आले. याचे शुभारंभ पालकमंत्री अॅड. पाडवी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
महामंडळाकडील धान्याची भरडई करून पॅकिंग केल्यानंतर धान्याचे वाटप सुरू करण्यात आले. भरडई होईल तसे हे धान्य वितरीत करण्यात येणार आहे. सबंधित जिल्ह्यांच्या मागणीनुसार धान्य देण्यात येणार आहे. यामुळे संकटात सापडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी जि.प. अध्यक्षा सीमा वळवी, खासदार हिना गावीत, आमदार विजयकुमार गावीत, राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, प्रकल्प अधिकारी वसुमन पंथ, तळोदा प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा- महाराष्ट्र दिन: नंदुरबारमध्ये साधेपणाने ध्वजारोहण सोहळा संपन्न