नंदुरबार- प्रकाशा येथील तापी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाचा खांब उभारण्यासाठी लोखंडी वेल्डिंगचे काम सुरू असून यात सर्रास घरगुती सिलिंडरचा वापर होत आहे. ज्या कंपनीला हा ठेका दिला आहे ते चक्क घरगुती सिलेंडर वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रकाशा येथील कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. प्रकाशा येथील पुलाचे काम एका नामांकित कंपनीला दिले आहे. मात्र, प्रत्यक्ष ठेकेदार येथे दिसत नाही. या ठिकाणच्या पोलच्या कामाच्या डागडुजीसाठी गॅसचा वापर करताना घरगुती सिलिंडरचा वापर होत आहे. नियमांचे पालन न करता सर्रासपणे ही कंपनी चक्क घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करताना दिसून येत आहे.
याच पुलावरून अधिकारी पदाधिकारी ये जा करतात. मात्र, हा सिलिंडर त्यांना दिसत नाही का? असे बोलले जात आहे. बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर वापर करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होईल का? या संदर्भात विचारले असता संबंधित ठेकेदार किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱयासमोर बोलण्यास नकार दिला.