नंदुरबार - पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासोबत विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळण्याच्या अनुशंगाने आज नंदुबारमध्ये ७ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने गणेश मूर्ती साकारण्याचा अनुभव घेतला. या गणेश मूर्ती विक्रीतून येणारा पैसा सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य खरेदीसाठी वापरला जाणार आहे.
अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ, त्रंबकेश्वर यांच्या मार्फत आज नंदुरबारमध्ये एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत आज नंदुरबारमधील ७ हजारांहुन अधिक शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने गणेश मूर्ती साकारल्या. या मूर्ती बनवतांना विद्यार्थ्यांमध्ये अनोख्या प्रकारचा उत्साह पहायला मिळाला. पर्यावरण संरक्षणासोबतच, संस्कृती ओळख आणि सोबतच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव हा या उपक्रमा मागील विविधांगी हेतु होता. या उपक्रमात सात हजारांहुन अधिक विद्यार्थ्यांनी गणराय साकारतांनाच विहंगम दृश्य देखील बरेच काही सांगुन जात होते. आपला आवडते दैवत गणराय स्वतच्या हाताने साकारण्याची अनुभुती विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होती.
हा उपक्रम साजरा करताना पर्यावरणाची पुरेपुर काळजी घेण्यात आली आहे. मूर्ती तयार करण्याच्या माती पासुन ते प्रत्येक मूर्तीच्या मातीत मिश्रीत करण्यात आलेल्या दोन बेलाच्या बिया याची काळजी घेण्यात आली आहे. या गणरायांचे विसर्जन केल्यानंतर ही माती ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी बेलाची झाले उगवतील हा या मागचा हेतू आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणरायाची केद्रामार्फत विक्री केली जाणार आहे. यातुन मिळालेल्या पैशातून सांगली, कोल्हापुरच्या पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खरेदी केली जाणार असल्याचे केंद्रामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
पुरग्रस्त विद्यार्थ्याच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांनी साकारलेला हा पर्यावरण पुरक गणेश उत्सवाचा उपक्रम निश्चितच कौतास्पद आहे. याला पाठबळ देण्यासाठी आपणही गणरायाची खरेदी करुन त्याला आपल्या घरात स्थापित करण्यासाठी एक पाऊल उचलण्याची गरज आहे. अशाच उपक्रमातुन टिळकांनी सार्वजनिक केलेला गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सार्थक ठरेल हे निश्चित.