नंदुरबार- शहादा तालुक्यातील मंदाणा येथे आज(मंगळवार) रोजी पहाटे पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. वडीलांच्या निधनानंतर आई नेहमीच आजारी असताना आपल्या आईसह तीन बहिणी व एका भावाचा सांभाळ करणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रुपाली पदमसिंग चव्हाण (वय १४) असे मृत मुलीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतकडून नळांना गावातील तांडावस्ती परिसरात पाणी सोडण्यात आले. नळांना पाणी आले असल्याने येथील रुपाली पदमसिंग चव्हाण ही मुलगी आपल्या आईसोबत पाणी भरण्यासाठी उठली. आई घरात इतर कामे करत असल्याचे पाहता रुपाली ही नळावरून पाणी भरण्यासाठी लावलेली मोटर सुरू करण्यासाठी गेली. परंतु डोळ्यांत अर्धवट झोप, बाहेर अंधार व सततचा पावसाचा ओलावा या कारणांमुळे मोटारीची पीन लावत असताना रुपालीला वीजेचा धक्का लागला. भांबावलेल्या अवस्थेत कसे तरी रुपालीच्या आईने मोटारीची कळ बंद केली. त्यानंतर रुपालीचा विजेपासून संपर्क तुटला व ती जमिनीवर येऊन पडली. शेजाऱ्यांना व परिसरात ही घटना समजताच तात्काळ रुपालीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. रूपालीच्या डोक्याला मार लागल्याने येथील १०८ रुग्ण वाहिकेवरील डॉक्टरांनी रूपालीला मृत घोषित केले.