नंदुरबार - राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात आहे. मात्र, या मतदाराचे नाव महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्याच्या मतदार यादीत असल्याने निवडणूक यंत्रणेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदार असलेला राजेश तडवी हा अक्कलकुवा तालुक्यातील मनिबेली गावात आपल्या नातेवाईकांकडे राहत होता. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या मूळ गावी गुजरात राज्यात राहण्यासाठी गेल्याने त्याचे नाव गुजरातमधील मतदार यादीत आहे आणि महाराष्ट्रातील मतदार यादीतही आहे. आपण गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी स्थायिक होतो, मात्र आता परिवारासोबत नर्मदा नदीच्या दुसऱ्या काठावर असलेल्या गुजरात राज्यातील आपल्या गावी गेल्याने आपले नाव दोन्ही मतदार यादीत आहे, असे तडवी यांनी सांगितले.
हेही वाचा - नव्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवलं, असं जीवन अन् राजकारणही नको; धनंजय मुंडे भावुक
राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि अतिदुर्गम मतदारसंघ म्हणून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये विखुरलेल्या या मतदारसंघात नर्मदा काठावरील गावांना जाण्यासाठी आजही निवडणूक कर्मचाऱ्यांना पायपीट करावी लागते. अजूनही अनेक गावांना रस्ते वीज अशा मूलभूत सुविधा नसल्याने हा मतदारसंघ निवडणूक आयोगाच्या दृष्टीनेही आव्हानात्मक आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट