नंदुरबार - पावसाची नाराजी शेतकऱ्याच्या जीवावर उठली आहे. सुरुवातीला आलेल्या पावसाने आता मात्र, दगा दिल्याचे चित्र खानदेशात दिसत आहे. खरिपाची पेरणी झाल्यानंतर अजूनही पाऊस येण्याची चिन्ह दिसत नसल्याने पीक वाया जाणार आहे. या दिवसेंदिवस होत चाललेल्या गंभीर परिस्थितीमुळे तात्काळ उपाययोजना करावी यासाठी नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. तसेच पावसाळा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांनी मका, उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी, तुर, भात आणि मुग अशा खरीप पिकांची लागवड केली आहे. मात्र, उगवून आलेल्या पिकांवर कमी पावसामुळे अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. बळीराजावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तसेच शहरी आणि ग्रामीण भागात पिण्याचे पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शासनस्तरावरून योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी नवापूर तहसील कार्यालयात नागरिकांनी निवेदन देऊन आंदोलन केले.