नंदुरबार - यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांची खरीपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतकऱ्यांना लागणारे युरिया खत लिंकिंगच्या माध्यमातून मिळत असून ते अन्यायकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कापूस, मका व सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे. पेरणीनंतर पिकांना खताची आवश्यकता असते. मात्र, सध्या बाजारात पुरेशी खते उपलब्ध असून देखील शेतकऱ्यांना ती मिळत नसल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
पेरणीसाठी युरिया महत्त्वपूर्ण असल्याने शेतकरी युरिया खरेदीसाठी गर्दी करत आहेत. प्रकाशा परिसरातील शेतकऱ्यांनी युरिया खरेदीसाठी रांगा लावल्या आहेत. मे महिन्यात खतांचा साठा मुबलक प्रमाणात होता. मात्र, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी खत खरेदी केली नव्हती. आता समाधानकारक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. विक्री करणाऱ्या दुकानांबाहेर मोठ्या रांगा लावल्या तरी पाहिजे तसा युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.