नंदुरबार - नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातील 52 वर्षीय महिलेचा मंगळवारी सायंकाळी कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे विसरवाडी गावात खळबळ उडाली आहे. या मृत कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना आरोग्य विभागाने नवापूर येथील विलगीकरण कक्षात क्वारंटाइन केले आहे. खबरदारी म्हणून विसरवाडी ग्रामपंचायतीने गावात निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे. आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.
विसरवाडी येथील उत्तम नगर येथे राहणाऱ्या 52 वर्षीय महिलेची दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने ती घरीच उपचार घेत होती. परंतु महिलेला जास्त अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी सदर महिलेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सकाळी आलेल्या अहवालात सदर महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. यामुळे विसरवाडी गावात एकच खळबळ उडाली.
गावातील महिला पॉझिटिव्ह आल्याची माहिती कळताच विसरवाडी ग्रामपंचायतीने खबरदारी घेत बाधित महिलेचे वास्तव्य असलेल्या उत्तम नगर परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली. तसेच सदर परिसरात नवापूरचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत वसावे, डॉ.शितलकुमार पाडवी, गताडी प्रा.आ.केंद्राचे डॉ.संगीता जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, सरपंच बकाराम गावीत, ग्रामविस्तार अधिकारी कैलास सोनवणे, वरिष्ठ लिपिक वसंत वळवी, रमेश गावीत, रवि वळवी, दासु गावीत, आरोग्य कर्मचारी आशा सेविका यांनी भेट देऊन 14 दिवसांपर्यंत उत्तम नगर परिसर कन्टेमेंट झोन जाहीर करत सील केला.
बाधित महिलेच्या संपर्कात पती, मुलगा यांच्यासह नोकर, वाहन चालक, मोलकरीण असे आठ जण आल्याने त्यांना नवापूर येथील विलगीकरण कक्षात क्वारंटाइन करण्यात आले.
विसरवाडीत महिला पॉझिटिव्ह आल्याने उत्तम नगर परिसरात उपाययोजना करण्यात येत होत्या. विसरवाडीत कोरोनाने शिरकाव केल्याने नागरीकांनी आरोग्याची काळजी घेत खबरदारी घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले. खबरदारी म्हणून गावात उपाययोजना सुरु असताना विसरवाडीतील बाधित महिलेचा सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. ही बातमी कळताच तालुका व ग्रामपंचायत प्रशासन अधिक खबरदारी घेत अलर्ट झाले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.