नंदुरबार - सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेलगत नंदुरबार हा मतदार संघ येतो. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ हिना गावित दुसऱ्यांदा विजयी होत आपला गड शाबुत राखला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अॅड. के. सी. पाडवी यांचा पराभव केला.
नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा निकाल ऐतिहासिक ठरला. खासदारकीसाठी एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये खरी लढत दिसून आली. मतमोजणीच्या वेळेस पहिल्या फेरीपासून काँग्रेस पक्षाला आघाडी मिळत गेली त्यामुळे ही लढत आम्ही जिंकू असे काँग्रेस नेत्यांना वाटू लागले तसेच महाराष्ट्रातून काँग्रेसला फक्त नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून आघाडी मिळत असल्याचे चित्र दिसत होते त्यामुळे याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होताना दिसून आली, परंतु काँग्रेसच्या उमेदवाराला पाचव्या फेरीनंतर मताधिक्य कमी झाले आणि सहाव्या फेरीनंतर भाजपच्या उमेदवाराला दोन हजाराची आघाडी मिळाली. आघाडीचा हा आकडा प्रत्येक फेरीत भाजपच्या पारड्यात वाढत गेला, विसाव्या फेरीपर्यंत भाजपच्या उमेदवाराला ६० हजारांची आघाडी मिळली, त्यानंतर भाजपचा उमेदवार विजयी होणार हे चित्र स्पष्ट झाले.
डॉक्टर हिना गावित यांचे घर मतमोजणी केंद्राच्या मागे असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, भाजप आघाडी घेत असल्याने आपणच विजयी होऊ, हा विश्वास व्यक्त करत विजय उत्सव सुरु झाला होता. विजयी उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना त्यांच्या परिवाराने विजयाचा पेढा भरवून आनंद साजरा केला.
काँग्रेसच्या उमेदवाराला नवापूर आणि साक्री विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली तर नंदुरबार शिरपूर शहादा या विधानसभा मतदारसंघातून भाजपला भरभरून मते मिळाली. भाजपचे बंडखोर उमेदवार डॉक्टर सुहास नटावदकर यांचा फटका डॉक्टर हिना गावित यांना कुठेही जाणवला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मतदारांमध्ये जागृती करून गेली. खासदार डॉक्टर हिना गावित यांनी उज्वला गॅस योजना, हर घर बिजली, प्रधानमंत्री आवास योजना, केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवून मतदारांमध्ये एक चांगली ओळख निर्माण केली होती त्याचा फायदा त्यांना झाला.
काँग्रेसच्या पराभवाची कारणे -
मतदारसंघात कोणत्याही मोठ्या नेत्याची प्रचार सभा झाली नाही, प्रचाराच्या काळात गटातटांचे वाद मिटवण्यात काँग्रेस असमर्थ ठरली, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि स्टार प्रचारक चंद्रकांत रघुवंशी आजाराने रुग्णालयात दाखल होते त्यांची अनुपस्थिती जाणवली. कांग्रेस पक्षाचे उमेदवार अॅड. के. सी. पाडवी यांनी आपला पराभव मान्य करून आम्ही कुठे कमी पडलो याच चिंतन करू मात्र नंदुरबार लोकसभा निवडणुकीत मोदी विजयी झाले आहेत, हिना गावित पराभव झाल्या आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय येणाऱ्या जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत किती महत्वाचा करतो हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.