नंदुरबार - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांना काँग्रेसने यावेळी उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी धडगावचे आमदार ऍड के.सी.पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे गावित गटामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. माणिकराव गावित तब्बल ९ वेळा खासदार राहिलेले आहेत.
माणिकराव यांचे पुत्र भरत गावितसुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंडखोरी करण्याच्या पावित्र्यात आहेत. ३० मार्चला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ते आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे. ३० तारखेच्या मेळाव्यानंतर या अपक्ष उमेदवारी बद्दलचे चित्र स्पष्ट होईल. तथापि, महाराष्ट्रात जागोजागी काँग्रेस पक्षाला खिंडार पडत असतानाच नंदुरबार जिल्ह्यातही काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.