नंदुरबार- राज्यातील प्रलंबीत वनहक्क कायद्या अंतर्गतचे जमीनीचे दावे वर्षभरात मार्गी काढून आदिवासींना वनजमीनी देण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहे. आज शहादा येथे त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजप उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवत त्यांना लक्ष केले. विशेष म्हणजे आजच्या सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात कोणाशी लढायच हेच आम्हाला समजत नाही. समोर कोणी पैलवान नाही. आपले पैलवान तेल लावून सज्ज असताना समोरच्यांची दयनीय अवस्था असल्याची टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी आघाडीवर केली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी बॅंकॉक फिरत आहेत. त्यामुळे त्यांनी आधीच हार मानली आहे. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपली हार आधीच मानली आहे. त्याची प्रचिती आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातूनच दिसून येत आहे. या जाहीरनाम्यातून नको ती आश्वासन दिली आहेत. त्यामुळे 'खोट बोला ते रेटून बोल', अशी अवस्था कॉंग्रेस राष्ट्रवादीची झाली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पंधरा वर्षाच्या सत्तेत काय दिवे लावले? असा आरोप करत आमच्या युती शासनाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आघाडीच्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त कामे झाली नसेल तर मत मागणार नाही, असा दावा करत जनेतने दोघांचा हिशबे घेण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्री यांनी केले.
सिंचनाच्या नावावर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत:च्या तिजोरींचे सिंचन केले. मात्र, आम्ही सिंचनाचे योग्य काम करत आहे. येत्या पंचवार्षिकमध्ये शहादा तालुका शंभर टक्के सिंचनाखाली आणू, असे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले. पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासी भागात रोजगार निर्माण करण्याची संधी शासन निर्माण करत आहे. भाजप शासनाने विविधांगी योजनेतून राज्याचा सर्वांगीन विकास केल्याचा दावा देखील फडवणीस यांनी केला आहे.